राज ठाकरेंची भूमिका दुटप्पी, शरद पवारांना उभा महाराष्ट्र ओळखतो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीयवाद वाढला. मुस्लिम मते जातील शरद पवार आपल्या भाषणात कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यांनतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंचे आरोप धादांत खोटे असून शरद पवारांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो असा पलटवार त्यांनी केला आहे. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंनी केलेला आरोप बिनबुडाचा असून त्याला काहीही अर्थ नाही . पवार साहेबांचं नाव घेतली कि बातमी होते, खरं तर राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणं योग्य नाही. जेव्हा राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली तेव्हा ते त्यांच्याबाबत काय बोलत होते असं म्हणत एवढी पण दुटप्पी भूमिका घेऊ नये असा पलटवार अजित पवारांनी राज ठाकरेंवर केला.

शरद पवारांना उभा महाराष्ट्र 55 वर्ष ओळखतोय. पवार साहेबांनी नेहमीच शाहू- फुले – आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवला. आणि त्याच पद्धतीने सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेण्याचे काम केलं. त्यामुळे राज ठाकरेंचा आरोप हास्यास्पद आहे, त्यामध्ये तसूभरही तथ्य नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरेंचा नेमका आरोप काय ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झाले. शरद पवार नेहमी आपल्या भाषणात शाहू, फुले आंबेडकरांचे नाव घेतात पण त्यांनी कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेतलं नाही. त्यांची जुनी भाषणं काढून पहा ते शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत कारण महाराजांचे नाव घेतलं कि मुस्लिम मते जातील असे ते म्हणाले