Friday, June 9, 2023

शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच घेणार ; अजित पवारांच मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे मार्च महिन्यापासून राज्यातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यानुसार हळूहळू दुकानं, बाजार, रेस्टॉरंट्स सुरु करण्यात आले. त्यातच मंदिरं आणि शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न सातत्याने सरकारला विचारला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

अजित पवार म्हणाले की, “अनलॉकच्या प्रक्रियेदरम्यान आम्ही क्रमाक्रमाने सर्वकाही सुरु करणार आहोत. परंतु ते करत असताना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेतली जाईल. शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न विचारला जातोय. परंतु आत्ता तरी ते शक्य नाही”.

अजित पवार म्हणाले की, “शेजारच्या राज्यांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या, मात्र तिथे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवायला घबरत आहेत. आपल्या मुलाला कोरोना झाला तर काय करायचं असा प्रश्न त्यांना पडतो. आम्हालाही मुलांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही. आम्ही दिवाळीनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतरच शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेऊ”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’