विरोधकांनो, तुम्ही महिलांना दमडी तरी दिली का? 5000 रुपयांची मागणी करणाऱ्या विरोधकांवर अजितदादा खवळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin) या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षापर्यंतच्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून केली जाणार आहे. एकीकडे या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे विरोधकांनी मात्र १५०० ऐवजी ५००० रुपये द्यावेत अशी मागणी केली होती. विरोधकांच्या या मागणीनंतर अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच खवळले. तुम्ही महिलांना दमडी तरी दिली का? असा संतप्त सवाल अजितदादांनी विरोधकांना केला.

विधिमंडळात आज अजित पवारांनी आपल्या भाषणात विरोधकांचा समाचार घेतला. विरोधक महिलांना दरमहा ५ हजार द्या म्हणतात, पण तुम्ही दमडी तरी दिली होती का?’’असा सवाल अजित पवारांनी केला. आपल्या खिशामध्ये किती आहे ते पाहूनच ओवाळणी टाकावी लागते. खिसा मोकळा असला तर फाटक्या खिशातून काही दमडी देता येईल का? असा प्रश्नही अजित पवारांनी केला.

यावेळी अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांनाही प्रत्युत्तर दिले होते. आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही एक लाख रुपये देणार होतो असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, बाबा आम्ही महिन्याला १५०० म्हणजेच दरवर्षी महिलांना १८ हजार देतोय यासाठी आपल्याला ४६ हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. एकूण अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत. जर आपण वर्षाला १ लाख रुपये याप्रमाणे हिशोब केल्यास अडीच लाख कोटी रुपये लागतील. त्यामुळे आपलं आपलं बजेट किती, काहीतरी लोकांना पटेल, असं सांगा असे म्हणत अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.