Wednesday, February 8, 2023

राज्यातील राजकारणाची पातळी घसरतेय; केंद्रीय तपास यंत्रणेच्या छाप्यावरून अजित पवारांचा भाजपवर निशाणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने आज राज्यातील पाच साखर कारखान्यांवर आणि बारामतीमधील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला आहे. आयकर विभागाच्या कारवाईत दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांचाही समावेश आहे. आयकर विभागाने छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे आहेत. या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “राजकारण कोणत्या पातळीवर केले जात आहे. हे जनतेने पाहावे. धाड का टाकली गेली?,” असा सवाल उपस्थित करीत पवार यांनी “राज्यातील राजकारणाची पातळी घसरतेय,” अशी टीका भाजपवर केली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले, अनेक ठिकाणी सध्या माझ्या कंपन्या आहेत. मी नेहमी कर भरत आलो आहे. कधीही करचुकवेगिरी केलेली नाही. वास्तविक धाडी टाकणे, चौकशी करणे हे आयकर विभागाचे काम आहे. माझ्या कंपन्यांवर धाड टाकली याचे मला काही नाही, पण नातेवाईकांवर धाड कशी? त्यांचा संबंध नसताना धाड टाकली याचे मला वाईट वाटत आहे. इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण केले जात आहेत. सरकार येत असते जात असते, पण जनता सर्वस्व आहे. जनता योग्य तो निर्णय घेत असते. आता जनतेनेच याबाबात ठरवावे कि मतदान कोणाला करावे.

- Advertisement -

आयकर विभागाच्यावतीने आज पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईत बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरही कारवाई करण्यात आल्याने याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली.