हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी जून महिन्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना अंधारात ठेऊन तब्बल ४० आमदारांच्या सोबतीने शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजितदादानी थेट शरद पवारांविरोधात थेट बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शरद पवार यांच्याकडील घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष सुद्धा निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिला. अजूनही सर्वोच्य न्यायालयात शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात सामना सुरु आहे. मात्र एकीकडे हे सगळं सुरु असताना सत्तेत जाण्यापूर्वी अमित शाह यांच्यासोबत किती बैठका घेतल्या आणि कशा पद्धतीने आपण दिल्लीला जायचो हे अजित पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं आहे.
सत्तानाट्यावेळी अजित पवार हे अमित शाहांसोबत (Amit Shah) बैठक करायचे, जवळपास १० बैठका अमित शाह आणि अजित पवार यांच्यात झाल्या. त्यावेळी अजित पवार सामान्य विमानाने प्रवास करत होते. मास्क आणि टोपी घालून त्यांचा दिल्ली-मुंबई, मुंबई-दिल्ली असा प्रवास व्हायचा. त्यांच्या या पेहरावामुळे बाजूला बसलेला माणूसही त्यांना ओळखू शकत नव्हता. इतकेच नाही तर अजित अनंतराव पवार या नावाऐवजी ते A.A Pawar अशा नावाने ते प्रवास करायचे. याच नावाने त्यांचा बोर्डिंग पास असायचा असं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
अजित पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. महारष्ट्राबाबत यांचं कपट कारस्थान किती आधीपासून होते हे तुम्हाला हळू हळू स्पष्ट होतंय. अजित पवार एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, नाव बदलून, टोप्या बदलून, मिशा बदलून अमित शाह याना भेटायला जात होते. महाराष्ट्राला रंगमंच आणि नाटकाची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राने बाळ गंगाधर यांच्यापासून ते श्रीराम लागू यांच्यापर्यंत अनेक कलाकार दिले. महाराष्ट्राला नाट्यसृष्टीची परंपरा आहे, त्या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष्य केलं असत दिसतंय. यांनाही नाटकातील रंगमंचावर घेतलं पाहिजे कारण हे उत्तम पद्धतीने मेकअप करतात, चेहरा बदलतात. हि फार मोठी गोष्ट आहे असा टोला राऊतांनी लगावला.