हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राज्यातील महायुतीमध्ये अनेक जागांवरून वाद निर्माण झालाय. भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना असे ३ पक्ष एकत्र असल्याने कोणत्या मतदार संघात कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायची यावर अजून तोडगा निघालेला नाही. भाजपकडून अजित पवारांना ३ जागा सोडण्यात येतील अशा बातम्या काल प्रसारमाध्यमात झळकत होत्या. यामध्ये बारामती, शिरूर आणि रायगडच्या जागेचा समावेश होता. मात्र अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा आणि माढा लोकसभेसाठी (Satara And Madha Lok Sabha) सुद्धा आग्रही आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यानुसार, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे सुद्धा आवाहन केलं आहे.
मुंबईत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे- पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, संजयमामा शिंदे, दीपक साळुंखे, प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होते. या बैठकीत माढा व सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. दोन्ही मतदारसंघात आपली ताकद असून या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. यानंतर सुनील तटकरे यांनी लवकरच महायुतीची बैठक होणार असून त्यावेळी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय होईल, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.
कशी आहे राजकीय परिस्थिती-
साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे सध्या शरद पवार गटात आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी पवार गटाकडून नक्की मानली जातेय. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपने गेल्या अनेक वर्षात साताऱ्यात मोर्चेबांधणी केली आहे, त्यामुळे भाजप साताऱ्याच्या जागेसाठी ठाम आहे. परंतु अजित पवार यांनाही साताऱ्याचा बालेकिल्ला सोडायचा नाही. सातारा लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे अशी नावे चर्चेत आहेत.
तर दुसरीकडे माढा मध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर पुनः एकदा निवडणुकीसाठी सज्ज झाले असतानाच भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील हे दोघे सुद्धा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र भाजपच्या या अंतर्गत वादात अजित पवारांनी उडी घेत थेट माढा मतदारसंघच राष्ट्रवादीसाठी मागितल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे भाजपची भूमिका नेमकी काय असणार ते आता पाहायला हवं….. अजित दादांना सातारा आणि माढा अशा दोन्ही जागा भाजप देत कि दोन्हीतील कोणती तरी एक जागा देऊन अजितदादांच्या मनाचं थोडं का होईना समाधान करतंय याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष्य असेल.