Lok Sabha Election 2024 : 4 जागांपैकी अजितदादा किती जागा जिंकतायत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती आणि महाविकास आघाडीत घासून झालेल्या अटीतटीच्या लढतीत सर्वात जास्त चर्चा झाली ती अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची…पक्षातील मातब्बर नेत्यांसह पक्षाचं नाव, चिन्ह मिळूनही अजितदादांना तिकीट वाटपात अवघ्या चार जागा पदरात पाडून घेता आल्या. त्यातही शिरूरच्या जागेसाठी अजितदादांना आढळराव पाटलांची शिंदे गटातून तर अर्चना पाटील यांची धाराशिवसाठी आयतवारी करावी लागली. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यानंतर आता राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल इव्हीएममध्ये बंद झालाय. त्यामुळे आता चर्चा सुरू झालीये. कोण कुठून निवडून येणार याची. आता यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला इन मीन चार जागा मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार कुठल्या जागेवरून जिंकून येतायत? की प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादांच्या हाती भोपळा उरतोय? तेच तुम्हाला सविस्तर सांगतोय.

पहिली जागा आहे ती शिरूरची (Shirur Lok Sabha 2024) . इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काटे की टक्कर झाली .. शरद पवार गटाकडून स्टॅंडिंग खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाने शिंदे गटातून आढळराव पाटलांची निवडणुकीच्या तोंडावर आयातवारी केली… त्यांच्या हातातील शिवबंधन सैल सोडून ऐनवेळी हातात घड्याळ बांधलं… सुरुवातीला अमोल कोल्हे यांच्यासाठी लढत वन साईड वाटत होती. पण आढळरावांच्या एंट्रीने शिरूरची जागा रेसमध्ये आली…गेल्या वेळेस अजितदादा, वळसे पाटील यांनी कोल्हे निवडून यावेत, म्हणून बऱ्याच खस्ता खाल्ल्या होत्या. पण आता हेच नेते विरोधात असल्याने शरद पवारांच्या मदतीने कोल्हेंनी लोकसभेची खिंड एकाकी लढवली..जुन्नर, आंबेगाव आणि खेड या पट्टयात कांदा प्रश्न महत्त्वाचा असल्याने कोल्हेंनी कांद्याच्या प्रश्नावरून सरकारला चांगलं कोंडीत पकडलं…जातीचा फॅक्टर कोल्हेंना इथं प्लसमध्ये घेऊन जाणार असला तरी जातीपासून ते थोडे लांबच राहिले.. कारण प्रसिद्ध अभिनेते, कलाकार आणि छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी यांच्यामुळे तयार झालेल्या त्यांच्या इमेजला यामुळे कुठेही धक्का लागला नाही. उलट समाजाने अगदी सायलेंटली कोल्हेंसाठी काम केल्याचं मतदारसंघात बोलले जातय… दुसऱ्या बाजूला कोल्हेंच्या समोर आढळराव पाटलांसारखा कसलेला नेता असतानाही त्यांचं गणितं मात्र बरेच फिस्कटलं.. सलग तीन टर्म धनुष्यबाणाच्या चिन्हावर खासदार राहिलेल्या आढळरावांना इथे निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून हातात घड्याळ घ्यावं लागलं…यामुळे त्यांच्या इमेज ला मोठा धक्का बसला… डमी उमेदवार म्हणून कोल्हे यांनाही यामुळे हातात आयात कोलीत मिळालं. थोडक्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा झालेल्या या शिरूरच्या अटीतटीच्या लढतीत तुतारीचा आवाज सध्या तरी जास्त दिसतोय…

Lok Sabha Election : Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत भोपळा मिळेल?

दुसरी जागा आहे ती रायगडची (Raigad Lok Sabha 2024). इथं अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरे गटाकडून अनंत गीते अशी लढत झाली… घड्याळ विरुद्ध मशाल अशा लढत झालेल्या रायगडमध्ये मतदानाची टक्केवारी घसरताना दिसली… ठाकरेंच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वार ग्रामीण पट्टयातून गीतेंना मोठं लीड देणारं ठरलं.. तर शहरी पट्टयात घड्याळाची चलती होती. तसं पाहायला गेलं तर सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी इथली पारंपारिक लढत… 2019 ला अनंत गीते यांना पराभवाची धूळ चारत तटकरेंनी कोकणात घड्याळाची टिकटिक सुरू केली. पण मधल्या काळात बरच राजकारण बदललं. शिवसेनेतील बंडावेळेस गीते एकनिष्ठ राहिले. तर अजितदादांच्या बंडाला सुनील तटकरे यांनी हवा दिल्याने एकनिष्ठ विरुद्ध बंडखोर अशी यंदाच्या प्रचाराची बेसलाईन होती. कागदावरचं गणित पाहिलं तर तशी तटकरेंसाठी ही तशी एकहाती लढत होती. पण मशालीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दिलेल्या मजबूत हातांनी वारं फिरलं. त्यात शेकापने गीतेंसाठी दिलेला मदतीचा हात रायगडच्या निकालातील महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. शिंदे गटाच्या अनेक नेत्यांचा इथे भरणा असला तरी सामान्य शिवसैनिक हा ठाकरेंच्या बाजूने राहण्याची रायगडमध्ये शक्यता होती. कदम पितापुत्र यांनी रत्नागिरीमधून तर भरत शेठ गोगावले यांनी महाड, पेण मधून ताकद लावल्याने आणि बूथ मॅनेजमेंटवर दिलेला सर्वाधिक भर पाहता रायगडचा निकाल घासून लागेल, असं सध्यातरी दिसतंय. त्यातल्या त्यात अनंत गीते यांचा निसटत्या लीडने रायगडमधून विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय…

आता पाहुयात तिसरा आणि सगळ्यांच्याच चर्चचा मतदारसंघ राहिलेला बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha 2024)… बारामतीची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची होती. इथून फक्त एका मतदारसंघाचा खासदार निवडून येणार नव्हता. तर इथल्या निकालावर खरी राष्ट्रवादी कुणाची? कार्यकर्ते कुणाच्या पाठीशी आहेत? बारामतीचा कौल कुठल्या पवारांना जातोय? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या निकालातून होणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत कन्फर्म झाल्यापासूनच बारामती ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूने जोर लावण्यात आला. अजित पवार, शरद पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे असे सगळेच पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढत होते. अजितदादांनी सहकारी संस्था, कारखाने आणि गाव पातळीवरील स्थानिक नेत्यांचं जाळ मजबूत करत बारामती, इंदापूर आणि दौंड सारख्या भागात आपलं वजन वाढवलं. घड्याळाची छाप सोडली. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी जुन्या जाणत्या नेत्यांना सोबत घेत प्रचाराला वेगळे डायमेन्शन्स आणले. शेवटच्या दिवसात महायुतीची फौज दाखल झाल्याने सुनेत्राताई यांच्या बाजूने पारड झुकताना दिसलं. पण सहानुभूतीचे मत प्लस, शरद पवार समर्थक मतं, भाजप विरोधी मत, अजितदादा विरोधी मत, महाविकास आघाडीच्या प्रभावाखालील मतं, दलित आणि मुस्लिम मत हे सगळं जोडून पाहिलं तर निकाल हा निसटत्या हाताने सुप्रिया ताईंच्या बाजूने लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय…

अजित पवार गट लढत असणारा शेवटची आणि चौथी जागा म्हणजे धाराशिवची (Dharashiv Lok Sabha 2024). इथं देखील रायगड प्रमाणे मशाल विरुद्ध घड्याळ अशी जोराची लढत झाली. शिवसेनेकडून स्टॅंडिंग खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी अजित दादांना बरीचशी चाचपणी करावी लागली… भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला छत्तीसचा आकडा सगळ्यांना माहित आहेच. धाराशिवची निवडणुकही या दोघांच्या अवतीभोवतीच फिरताना दिसते. यंदा मात्र करंट लागावा असं राजकारण बदललं. जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी भाजपतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेचं तिकीट मिळवलं… त्यामुळे पक्ष आणि चिन्ह बदलले गेले असले तरी ही लढत देखील पाटील विरुद्ध निंबाळकर अशीच झाली. कमळाच्या चिन्हावर मशालीच्या विरोधात उमेदवार उतरवला, तर त्याचा मोठा फटका बसू शकतो, असा कदाचित भाजपाचा अंदाज असावा. म्हणून त्यांनी धाराशिवमध्येही मशालीला थेट भिडण टाळलं…पण तरीदेखील ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेचा मोठा इम्पॅक्ट धाराशिवमध्ये पाहायला मिळाला… वाढलेली महागाई, शेतीचे प्रश्न आणि मराठा आरक्षण हे सगळे मुद्दे ओमराजे निंबाळकरांच्या पथ्यावर पडताना दिसून आलं. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ओमराजेंनी लीड घेतली होती. तीच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटवरही कायम ठेवल्याने इथं मशाल निवडून येतेय, असा एकूणच कल आहे…

एकूणच काय तर अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या पाच जागांपैकी एक जागा त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपला सोडल्यामुळे उरलेल्या चार जागांवर लढत अटीतटीची होईल. पण खूप मोठ्या कष्टाने एखाद्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवता येईल, असं सध्यातरी चित्र आहे. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी चार पैकी किती जागांवर जिंकून गुलाल उधळेल? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.