दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस
शनिवारी 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता दिवड तालुका माण येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामीण विकास सहकार प्रशिक्षण कार्यशाळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दहिवडी येथे पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेच्या वेळी उपसभापती नितीन राजगे, राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब काळे, राष्ट्रवादीचे माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत हे उपस्थित होते. यावेळी प्रभाकर देशमुख बोलताना म्हणाले, या ग्रामीण विकास सहकार प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटी संचालक, चेअरमन नगराध्यक्ष व नगरसेवक व माण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, लेखापरीक्षण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी क्षीरसागर यांचे मार्गदर्शन होणार आहे तर या कार्यशाळेच्या निरोप समारंभाच्या वेळी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी माण खटाव मतदार संघातील पाणी रोजगार या प्रमुख प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सोशल अंतर पाळून होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे.