हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा, शेतकऱ्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करा, शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना अजित पवारांनी मग्रुरीची भाषा वापरत हाकलून लावल्याची घटना पुण्यात घडली आहे. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, एका कार्यक्रमात बोलत असताना समोर उपस्थिती प्रेक्षकांमधील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणाबद्दल आणि शेतकरी कर्जमाफी बद्दल अजित पवारांकडे न्याय देण्याची मागणी केली, मात्र अजित पवारांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न देता बाहेर काढा रे याना अशा सूचना पोलिसाना दिल्या. सोशल मीडियावर याबाबचे व्हिडिओही व्हायरल झाले.
नेमकं काय घडलं?
आज पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांसमोरच काही आंदोलक शेतकऱ्यांनी बच्चू कडूंचे उपोषण आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजितदादांना घेरण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडू हे उपोषणाला बसलेत, त्यांना रक्ताची उलटी झालीय.. तुम्ही न्याय द्या, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी विनंती केली. यावर उत्तर देताना अजित पवारांनी कालच्या बावनकुळे- बच्चू कडू भेटीचा दाखला दिला. परंतु आम्ही कर्जमाफी करतोच असं कोणतेही ठोस असं उत्तर या शेतकऱ्यांना दिले नाही. यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी अजितदादांकडे आणखी प्रश्नाची सरबत्ती केल्यानंतर, बस करा आता असं उर्मट उत्तर देत सदर आंदोलक शेतकऱ्यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्याच्या सूचना अजित पवारांनी पोलिसाना दिल्या. अजित पवारांच्या आदेशानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमातून हाकलून लावलं. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचेच नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अजित पवारांनीच फेटाळली होती कर्जमाफी-
दरम्यान, अजित पवारांनीच सर्वात आधी शेतकरी कर्जमाफी फेटाळून लावली होती. खरं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी आश्वासने महायुती सरकारने दिली होती, त्या सरकार मध्ये अजित पवारही होते. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसताच अजित पवारांची भाषा बदलली. शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही असं उद्धट उत्तर त्यांनी एका कार्यक्रमात दिले होते. सगळे सोंग करता येते. पण पैशाचा सोंग करता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चच्या आत पीकविमा भरावा, पुढील २ वर्ष तरी शेतकरी कर्जमाफी देता येणार नाही असं मुजोरीचे उत्तर अजित पवारांनी यापूर्वी दिले होते. आताही त्यांना कर्जमाफी बद्दल विचारलं असताना सदर शेतकऱ्यांना त्यांनी कार्यक्रमाच्या बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.