विरोधक लाडकी बहीण योजना बंद करणार? अजितदादा म्हणाले, भगिनींनो आता तुम्हीच निर्णय घ्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. आत्तापर्यंत या योजेनचे एकूण २ हप्ते महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले असून महिलावर्गात मोठया आनंदाचे वातावरण आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने या योजनेत खोडा घालण्याचे काम सुरु आहे. त्यातच आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार ( Sunil Kedar) यांनी तर आमचं सरकार आल्यानंतर हि योजनाच बंद करू असं विधान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केदार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच भगिनींनो आता तुम्हीच ठरवा कि कोणाला साथ द्यायची असं म्हणत अजितदादांनी महिलांना आवाहन केलं आहे.

अजित पवार यांनी याबाबत आपल्या ट्विटर हॅन्डल वर ट्विट करत म्हंटल, महाराष्ट्राची ही निवडणूक स्त्रीशक्तीची निवडणूक आहे. यावेळी आमच्या माय माऊली महाराष्ट्राचे भवितव्य घडवतील. महायुतीने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या पक्षांनी स्पष्ट केले आहे की ते ही योजना बंद करतील. आता महाराष्ट्राच्या बहिणींनी निर्णय घ्यायचा आहे की आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला साथ द्यायची की त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करू पाहणाऱ्या विरोधकांना साथ द्यायची आहे? असा सवाल करत एकप्रकारे आम्हालाच साथ द्या असं आवाहन अजित पवार यांनी महिलावर्गाला केलं आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद करू या सुनील केदार यांच्या विधानाने महाविकास आघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी सुनील केदार यांच्या या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ भविष्यात महाभकासचं सरकार जर आलं तर काँग्रेसचे भ्रष्ट नेते सुनील केदार ती बंद करणार आहेत म्हणे. महाराष्ट्रातील चांगल्या योजनांना कायम विरोध करणारा हा आहे लाचार काँग्रेसचा खरा चेहरा, अशी टीकेची झोड शीतल म्हात्रे याची उठवली आहे. तर दुसरीकडे संजय निरुपम यांनीही सुनील केदार यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हंटल कि, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींच्या घरी मुख्यमंत्री भेटी देत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. काँग्रेसला आधीच अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागत असून त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेस हादरली असल्याची टीकाही निरूपम यांनी केली आहे.