स्वतंत्र्यपूर्व काळापासून नवसाला पावणारा आजोबा गणपती

सोलापूर प्रतिनिधी| सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजाला एकसंध ठेवण्यासाठी 1885 ला आजोबा गणपतीची स्थापना करण्यात आली.  या मूर्तीच वैशिष्ट्य म्हणजे हा शाडूचा ‘इको फ्रेंडली’ गणपती आहे. या गणपतीचा थाट हा ‘आजोबांप्रमाणे’ रुबाबदार असल्यामुळे ‘आजोबा गणपती’ हे नाव प्रचलित झाले.

धार्मिक कार्यक्रमांतून निर्माण होणारे बळ राष्ट्रीय चळवळीसाठी वापरावे आणि स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून तरुणांना संघटित करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. नवस केल्यानंतर भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या आजोबाचा गणपतीचा महिमा सर्वदूर पसरलेला पाहायला मिळत आहे.

गणपती उत्सवाच्या काळात आजोबा गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांचा ओढा अधिक वाढलेला दिसून येतो. आजोबा गणपतीची पहिली मूर्ती नीलप्पा उजळंबे, आडव्यप्पा माळगे, आवटे या मूर्तिकारांनी कामठ्या, रद्दीचा कागद, खळ, चिंचुक्याचे पीठ आणि कापड आदी वस्तू वापरून ही मूर्ती साकारली होती. आजोबा गणपती सुरुवातीला शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर त्रिपुरंतकेश्वर मंदिरात बसवून तेथेच गणेशोत्सव साजरा करत. नंतर उत्सव साजरा करण्यासाठी बसवेश्वर मंडळाची स्थापना करण्यात आली. सिद्रामप्पा फुलारी, पंचप्पा जिरगे, इरय्या स्वामी, अण्णाराव वजीरकर, हत्तुरे, नंदीमठ, ढवणे यांचा या मंडळामध्ये समावेश होता.

You might also like