Tuesday, January 7, 2025

अक्कलकोटमध्ये भाविकांच्या कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळी भाविकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिर, शेगावमध्ये गजानन महाराज मंदिर, पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला अक्कलकोटमध्ये (Akkalkot) काही भाविकांवर काळाने घाला घातला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन पुन्हा घरी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातामध्ये एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सातपेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी अक्कलकोटमध्ये स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या कारचा मैंदर्गी येथे भीषण अपघात झाला. प्रवासादरम्यानच स्कोर्पिओ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेमध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले, तर 4 जणांनी आपला जीव गमावला.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर त्यांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. तसेच, जखमींना उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले.