हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पवार (Sharad Pawar) सांगतात तो अकोलेचा (Akole Vidhan Sabha) आमदार होतो… हा काही डायलॉग नाही तर हे नगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभेचं वास्तव आहे… खरंतर हा मतदारसंघ ओळखला जातो तो मधुकर पिचड यांच्या नावाने… शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे, त्यांच्या अत्यंत जवळचे अभ्यासू मित्र म्हणून पिचडांची ओळख… म्हणूनच 1980 पासून ते 2014 पर्यंत फक्त पिचडच इथून आमदार, मंत्री, सत्तेतील पदांवर राहिले… 2014 ला आपल्या मुलाला म्हणजेच वैभव पिचड यांनाही राजकारणात चांगला जम बसवून दिला… पण 2019 ला याच अनबीटेबल पिचड पिता पुत्रांच्या जोडगोळीने सर्वांनाच धक्का देत भाजपात प्रवेश केला… शरद पवारांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता… अशा वेळेस कडव आव्हान तर सोडाच पण उमेदवारीचीही आयात वारी पवारांना करावी लागली… भाजपने वैभव पिचड यांना राष्ट्रवादीतून घेत कमळाच्या चिन्हावर तिकीट देऊ केलं… तर राष्ट्रवादीने भाजपमधील किरण लहामटे यांच्या हातात आयत्या वेळी घड्याळ बांधत निवडून आणलं… वैभव पिचड यांचा पराभव करत लहामटे जायंट किलर ठरले… पवारांची साथ सोडतो त्याचा गेम होतो… असा मेसेजही या निकालातून अप्रत्यक्षपणे गेला… पण हेच लहामटे आता राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांसोबत आलेत… त्यामुळे पिचड पिता पुत्रांचा, आणि स्टॅंडिंग आमदार लहामटेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवारांनी एक नवा मोरा शोधलाय… आणि नुसता शोधलाच नाही, तर त्याला उमेदवारीही देऊ केलीय… शरद पवारांचा अकोले विधानसभेसाठीचा हा हुकमी एक्का कोण? किरण लहामाटे, वैभव पिचड हे दोघेही महायुतीच्या एकाच छताखाली आल्याने उमेदवारी कोणाला मिळेल? पिचड, लहामटे यांचं राजकारण बॅकफुटला टाकत पवारांचा हा माणूस आमदारकी जिंकण्या इतपत खरंच कॅपेवबल आहे का? अकोले मतदारसंघाचं येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं संपूर्ण, सखोल आणि साधं सोपं विश्लेषण समजून घेऊया.
कळसुबाई, हरिश्चंद्रगड, भंडारदरा ही पर्यटन स्थळ घेऊन वावरणारा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणारा अकोले विधानसभा मतदारसंघ जितका निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो.. त्यापेक्षा जास्त ओळखला जातो तो इथल्या मधुकर पिचड या नावाने… तब्बल 1980 पासून मुसाफिरी करणाऱ्या पिचडांचं राजकारणच शरद पवारांसोबत वाढलं… मोठं झालं… अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थात्मक सदस्य झाल्यानंतरही त्यांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणुका लढल्या… आणि जिंकल्या देखील… 1980 ते 2014 अशा सलग सात टर्म आमदार म्हणून निवडून जाण्याचा आवळा वेगळा रेकॉर्डही त्यांच्याच नावावर राहिला… 2014 ला मात्र त्यांनी राजकारणातून स्वल्पविराम घेत आपला मुलगा म्हणजेच वैभव पिचड यांना राजकारणाच्या मैदानात उतरवलं… खरंतर भाजपच्या बाजूने असणारं वारं आणि घराणेशाहीचा शिक्का पडलेला असल्याने वैभव पिचडांसाठी घोडे मैदान लांब होतं… मात्र त्यांनी शिवसेनेच्या मधुकर तळपाळे यांचा पराभव करत वडिलांचा अकोले विधानसभेच्या आमदारकीचा वारसा पुढे चालवला…
पिचड पिता पुत्रांसाठी तसा राजकारणाचा कार्यक्रम ओके होता… पण 2019 मध्ये त्यांनी असा एक निर्णय घेतला, ज्याची कल्पना कोणी केलीही नव्हती… विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिचड पिता पुत्र राष्ट्रवादीतून भाजपात आले… अर्थात हा शरद पवारांसाठी आणि राष्ट्रवादीसाठीही मोठा धक्का होता… कारण पिचडांची शरद पवारांप्रती असणारी निष्ठा सर्वांनाच ठाऊक होती.. त्यामुळे ते असा निर्णय घेतील, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती… पण भाजपचं सरकार येणार असल्याने सत्तेत राहून विकास कामे करण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं स्पष्टीकरण पिचडांनी दिलं… पण हा एक निर्णय आपल्याला कुठे घेऊन जाईल? याची कल्पना वैभव पिचड यांना नव्हती…
सर्वात पहिलं म्हणजे मतदार संघातला आदिवासी समाज जो पिचडांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा… तो या भाजप प्रवेशाने दुखावला गेला… पिचडांचे कट्टर विरोधक ओळखले जाणारे अशोक भांगरे यांनीही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पिचडांना चांगलंच जाम केलं… त्यात पिचडांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीनेही भाजपमधूनच डॉ. किरण लहामटे यांचा पक्ष प्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारी जाहीर केली… लहामटे विरुद्ध वैभव पिचड अशा झालेल्या या अटीतटीच्या लढतीत किरण लहामटेंनी मैदान मारत ते जायंट किलर ठरले… थोडक्यात अकोले हा काही पिचडांचा नव्हे तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे… असा जणू मेसेजच यातून शरद पवारांनी दिला…
पण नुकतीच राष्ट्रवादीत फूट पडली… त्यावेळेस नाही हो म्हणता म्हणता डॉ. किरण लहामटे यांनी अखेर अजितदादा गटाची वाट धरली… त्यामुळे ‘ज्याचा आमदार त्याला तिकीट’ हा फॉर्मुला वापरला तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून लहामटे यांचं नाव सर्वात फ्रंटला आहे… लहामटे महायुतीत आल्याने मात्र वैभव पिचड यांच्यासाठी आमदारकीची सोडा… पण उमेदवारीचीही वाट बिकट झाली आहे… नक्की कोणता राजकीय स्टॅन्ड घ्यायचा? हा संभ्रम अजूनही पिचड पिता पुत्रांपुढे आहे… यातून मार्ग निघाला नाही, तर आतापर्यंत केलेल्या राजकारणावर तुळशीपात्र ठेवण्याची वेळ येऊ शकते… याची पुरेपूर कल्पना पिचडांना आहे… म्हणूनच मध्यंतरी पिचड पुन्हा शरद पवार गटात जाऊन राजकारण जिवंत ठेवणार असल्याच्या बऱ्याच वावड्या उठल्या… पण स्वतः वैभव पिचड यांनीच यात काही तथ्य नसल्याचं सांगत आपण भाजप सोबतच आहोत, ते क्लिअर केलं… अर्थात भाजपकडून त्यांना उमेदवारीचा शब्द मिळाला आहे का? असा प्रश्नही या निमित्ताने पुढे येऊ लागलाय…
पण शरद पवारांनी राजकारणात एक पाऊल पुढे टाकत अकोले येथील कार्यक्रमात त्यांनी विद्यमान अजितदादा गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना झोडपून काढलं… पाच वर्षांपूर्वी मी एका डॉक्टरला म्हणजेच आमदार किरण लहामटे यांना संधी दिली. मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल. त्यांनी काही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं भाषण केलं होतं. पण मुंबईत गेल्यानंतर मात्र हा भलतीकडे जाऊन बसला. कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत खाली बसवायची वेळ आली आहे. आता अमित भांगरे या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही…. असं म्हणत त्यांनी घड्याळाच्या विरोधात तुतारीकडून आधीच अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे इथे घड्याळ विरुद्ध तुतारी, लहामटे विरुद्ध भांगरे अशी अटीतटीची लढत पाहायला मिळेल, असं म्हणता येऊ शकतं… पण या सगळ्या फ्रेम मध्ये पिचड नेमकी काय भूमिका घेणार? यामुळे मात्र सर्वच स्थानिक नेत्यांची धडधड वाढली आहे…