Badlapur Akshay Shinde’s Encounter : बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या बालिकावर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या आरोपीला पोलीस एन्काऊंटर मध्ये ठार करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. अक्षय शिंदेने पोलिसांनी बंदूक घेऊन पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यांमुळे आम्हाला स्व- संरक्षणासाठी त्याला गोळी मारावी लागली असा दावा पोलिसांनी केला, मात्र या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येऊ नये म्हणून अक्षयचा मुद्दाम बळी घेण्यात आला असा आरोप करत महाविकास आघाडीने सरकारला लक्ष्य केलं आहे. मात्र अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर नंतर जनतेमध्ये मात्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे कौतुक करणाऱ्या हजारो पोस्ट पडल्या. एक कीड ठेचून काढल्याचा आनंद आज महाराष्ट्रभरात दिसून आला. मात्र या घटनेचे राजकारण करणारे चेहरे देखील तितक्याच भेसूरपणे प्रकाशात आल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली.
बदलापूर येथे एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे हा तरुण सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. एक ऑगस्ट रोजी त्याची नियुक्ती झाली. आणि पंधरा दिवसात त्याने आपल्या विकृतीचे दर्शन घडवले. या शाळेत शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींनी आपल्या पालकांकडे तक्रार केली. आपल्या नाजूक ठिकाणी वेदना होत आहेत, असे त्यांनी पालकांना सांगितले. पालकांनी शाळेवर मोर्चा नेला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली. मात्र ही घटना घडताच दुसऱ्या दिवशी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आला. हजारो लोक अचानक ट्रॅकवर जमा झाले. सुमारे नऊ तास बदलापूरहुन मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प करण्यात आली. उत्स्फूर्तपणे झालेल्या या आंदोलनात अचानक राजकीय बॅनर आले. पोलिसांवर दगडफेक झाली. शाळेची तोडफोड झाली. राजकीय प्रतिक्रिया झपाट्याने उमटू लागल्या. आणि आंदोलनाच्या मागे लोक भावना नसून राजकीय हेतू असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणातील आरोपीचा आंध्रप्रदेश प्रमाणे एन्काऊंटर करण्याची मागणी केली. सुषमा अंधारे यांचीही तशीच मागणी होती. इवल्याशा जीवांना छळणाऱ्या त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही मागणी करण्यात आघाडीवर होते. बालिकांच्या शोषणाची तक्रार दाखल होताच बदलापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मुख्य आरोपी अक्षय शिंदे जिथे राहत होता त्या गावातील नागरिकांनी त्याच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला. त्याची तीन लग्न झाली होती असे उघडकीस आले आणि विभक्त पत्नींपैकी एका पत्नीने त्याच्या विरोधात शारीरिक शोषणाची तक्रार दाखल केली. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता त्याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर विरोधक मात्र सरकारवरच आक्रमक झाले. अक्षय शिंदे बंदूक चालवूच कसा शकतो? पोलिसांनी त्याला बुरखा घातला नव्हता का? असा उलट सवाल विरोधकांनी केला. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या या कृतीचे ठाम शब्दात समर्थन केले. पोलीस स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारच, असा दावा फडणवीस यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चकमकीतील पोलिसांना बक्षीस जाहीर केले. राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही पोलीस कारवाईचे समर्थन केले. पुण्यात या घटनेच्या समर्थनार्थ पेढे वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह चकमकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोलिसांची बाजू घेतली. सोशल मीडियावर ” देवाचा न्याय” या नावाने एक हॅशटॅग ट्रेंड झाला. पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करणाऱ्या हजारो पोस्ट या अंतर्गत नागरिकांनी टाकल्या. पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनमुराद कौतुक महाराष्ट्राने केले. . दोन चिमूरड्यांना न्याय मिळाल्याची भावना सामूहिक रित्या व्यक्त झाली.
विरोधकांच्या उलट प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी मात्र जनभावनेच्या उलट प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी आंदोलन करणाऱ्या सुषमा अंधारे या पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप करीत आहेत. अक्षय शिंदे याला अन्यत्र देण्यात गृह खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. मविआचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पोलिसांवर संशय व्यक्त करणाऱ्या आहेत. यामुळे चार वर्षांच्या बालिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अक्षय शिंदे च्या प्रकरणात सुद्धा विरोधक राजकारण शोधत आहेत, असा आरोप असंख्य लोक सोशल मीडियावर करीत आहेत. तसेच बलात्काऱ्याला पाठीशी घालणारे आणि त्याची बाजू घेणारे राजकारणांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही अशा हजारो प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.