शेतकरी सुखावला! राज्यात सर्व बाजार समितीमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव, ६ वर्षांत पहिल्यांदाच उच्चांक गाठला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाशीम । तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. कारण तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. हमीभाव 5800 असला तरी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये शेतकरी आपल्याकडे असलेल्या तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून तुरीचे भाव वाढताना दिसत आहे. आज पुन्हा तुरीच्या भावामध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून आता 9500 रुपये प्रती क्विंटल दराने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे.

वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीच्या बाजारभावाने ६ वर्षांत पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. 2014 मध्ये 13 हजार रुपये प्रती क्विंटल दराने विक्रीनंतर, गेल्या ६ वर्षात तूर विक्रीसाठी मोठ्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. आता बाजार समितीमध्ये तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अडीच ते साडे तीन हजार रुपयांचा अधिकचा दर मिळत आहे.

एकट्या वाशिम जिल्ह्यात १ लाख नऊ हजार 231 क्विंटल तूर शासनाने 5800 रुपये दराने खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आजच्या दराच्या तुलनेत 3 हजार रुपये नुकसान होत आहे. मात्र या खरेदीतून सरकारला जवळपास 30 कोटी रुपयांचा फायदा सरकारला झाला. अशाच प्रकारे राज्यातील इतर जिल्ह्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यामुळे सरकारने आधारभूत किमतीने विक्री केलेल्या नफ्यामधून शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार थांबले होते. अनलॉक प्रक्रियेत हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. यानंतर मागणी वाढल्याने तुरीचे दर वाढले असल्याचं कळतं. तर या वर्षी खरीप हंगामात पिकाचं मोठं नुकसान झालं. परिणामी पिकाच्या उत्पादनात घट होणार असल्याने दरवाढ होत असल्याचं जाणकार सांगतात. मात्र, या दरवाढीमुळं ग्राहकांना तूरडाळ खरेदी करण्यासाठी खिसा थोडा आणखी ढिला करावा लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”