शहरातील सर्व बांधकामे 1 ते 4 एप्रिल दरम्यान बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने 1ते 4 एप्रिल 2022 पर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे काल पत्रकार परिषदेत अध्यक्ष राजेंद्र कुंडलवाल, उपाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी जाहीर केले.

जिल्ह्यातील सर्व बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्सना व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि इमारत बांधकामाच्या दरात एकसूत्रता आणणे हा या संघटनेचा स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता. अकुशल कामगारांच्या मजुरीत मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी किमान 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच वाढलेल्या बांधकाम साहित्याच्या किमतीमुळे बांधकाम ठेकेदार अडचणीत आहेत. बांधकामाच्या दरात वाढ होणे यावर उपाय आहे. बांधकाम क्षेत्र हे असंघटित क्षेत्र असल्यामुळे आमच्या मागण्या मांडण्यासाठी आमच्याकडे कुठलाही मंच उपलब्ध नाही. म्हणून आमच्या मागण्यांकडे जनतेचे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तसेच खासगी बांधकाम करणारे घरमालक यांचे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे संघटनेने सांगितले.

यापुढील उर्वरित कामांचे दर किमान 25 टक्क्यांनी वाढ होणे हे संघटनेचे उद्दिष्ट आहे. नवीन कामाचे नवीन दर पत्रक तयार करण्यात आले आहे. क्रेडाईला सुद्धा याबाबत एक निवेदन देण्यात येणार आहे. सर्व बांधकाम ठेकेदारांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुंडलवाल आणि उपाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी केले.