करहर येथे आषाढीला भाविकांना सर्व सुविधा पुरवाव्यात : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

आषाढी एकादशीनिमित्त करहर येथील विठ्ठल मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनाने भाविकांना सर्व सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करहर येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार राजेंद्र पोळ, हणमंत पार्टे, प्रमोद शिंदे, समाधान पोफळे, नितीन गावडे, अरुण यादव (गुरुजी), पंचायत समितीचे गट विकास अधिकारी काळे, सहायक पोलीस निरीक्षक माने, पाणीपुरवठ्याचे साठे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे पवार, उपविभागीय अभियंता इनामदार यांच्यासह पदाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठकीत भाविकांसाठी आरोग्यसेवा, स्वच्छता याबाबत सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पावसामुळे चिखल होत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांवर मुरूम टाकणे आदी निर्णय घेण्यात आले. प्रशासनातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. करहर येथे येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.

Leave a Comment