Wednesday, February 8, 2023

दिल्ली निर्भया प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली; चौघांचीही फाशी कायम

- Advertisement -

टीम, HELLO महाराष्ट्र। देशभर गाजलेल्या निर्भया बलात्कार आणि खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी असलेल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा बुधवारी झालेल्या सुनावणीत कायम ठेवली.  या खटल्यातील आरोपी अक्षयकुमार सिंह याची फाशीविरोधातील फेरविचार याचिका यावेळी फेटाळण्यात आली. या खटल्याच्या मूळ निकालात त्रुटी नसल्याने त्याचा फेरविचार करण्याचा प्रश्नच नाही. हे प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ या प्रकारात मोडत असल्याने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात येत असल्याचं न्यायमुर्ती आर. बानुमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं .

या खटल्यातील चारही आरोपींना २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या खटल्यात अक्षयकुमार सिंह, मुकेश (३०), पवन गुप्ता (२३), विनय शर्मा (२४) हे आरोपी आहेत. मुकेश, पवन आणि विनय या तिन्ही आरोपींच्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ९ जुलै रोजी फेटाळल्या होत्या. त्याआधी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांच्यापुढे पीडितेचे पालक आणि दिल्ली सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. फाशीच्या अंमलबजावणीचा निर्देश जारी करण्यासाठी दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी घेताना न्या. अरोरा यांनी आरोपी दयेचा अर्ज करणार आहेत का, हे स्पष्ट होण्यासाठी एका आठवडय़ाची मुदत दिली. आरोपी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करणार आहेत का, याची माहिती त्यांच्याकडून आठवडय़ाभरात घ्या, अशी सूचना न्या. अरोरा यांनी तिहार तुरुंग प्रशासनाला केली. यामुळे फाशीची अंमलबजावणी तात्काळ होणार नसल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पीडितेच्या आईला न्यायालयात रडू कोसळले. आरोपींना संधी दिली जाते. पण पीडितेच्या अधिकाराचे काय, असा सवाल तिने केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी होणार आहे.