टीम हॅलो महाराष्ट्र। मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी ८ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये २५ कोटी भारतीय सहभागी होतील असं समितीने सोमवारी स्पष्ट केलं आहे.
देशात आर्थिक मंदी, महागाई, बेरोजगारीची दारुण समस्या उभी आहे. अशावेळी कामगार कायद्यात मालकधार्जिणे बदल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण, कंत्राटीकरण करण्यातचा सपाटा लावला आहे. जनताविरोधी धोरणे राबवण्याचा चंगच केंद्र सरकारने बांधला आहे. याला विरोध करण्यासाठी देशभरातील कामगार संघटनांनी उद्या देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे.
उद्या ८ जानेवारी रोजी होणाऱ्या या देशव्यापी संपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी या राजकीय पक्षांच्या संलग्न कामगार संघटनांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे सेन्ट्रल स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई फेडरेशन, सर्व बँका, एलआयसी, जीआयसी, पोर्टट्रस्ट, डिफेन्स, सिव्हिल एव्हिएशन, बीएसएनएल, एमटीएनएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याच्या कामगार संघटना या संपामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच यामध्ये सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, असंघटित कामगारांमध्ये अंगणवाडी सविका, मोलकरीण व बांधकाम कामगार संघटना, आशा वर्कर्स सहभागी होणार आहेत.
याचसोबत देशभरातील ६० वेगवेगळ्या विद्यार्थ्यी संघटनांनीही या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देशामध्ये शिक्षणाचे व्यापारीकरण होत असल्याने विद्यार्थीही या संपामध्ये सहभागी होणार असल्याचे या संघटनांनी म्हटलं आहे. कामगार संघटनांच्या या बंदला देशभरातील १७५ शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. ८ जानेवारी रोजी ‘ग्रामीण भारत बंद’ही पाळला जाणार आहे.