टीम हॅलो महाराष्ट्र। देशभरात एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन वादंग उठलेलं असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात राहणारे १३० कोटी लोक हिंदूच असल्याचं म्हटलं आहे. धर्म आणि संस्कृतीची पर्वा न करता जो राष्ट्रप्रेमाला सर्वाधिक महत्व देतो तो हिंदूच असल्याचं वक्तव्य मोहन भागवत यांनी नुकतंच केलं आहे.
‘जी व्यक्ती भारताला आपली मातृभूमी मानते, देशातील जन, जल, जमीन, प्राणी यांसह संपूर्ण भारतावर प्रेम करते, भारताची भक्ती करते, भारताच्या संस्कृतीला आपल्या जीवनात स्थान देतो, अशी कोणतीही व्यक्ती जी कोणतीही भाषा बोलत असेल, ती कोणत्याही प्रांतातील असेल, पूजा अर्चना करत असेल किंवा करत नसेल तो भारतमातेचा सुपुत्र हिंदू आहे. त्यामुळे भारतातील १३० कोटी लोक हे हिंदूच आहेत. हा संपूर्ण समाज आपला आहे आणि असा एकात्मिक समाज निर्माण करण्याचे संघाचे ध्येय आहे,’ असं भागवत म्हणाले.
‘सर्वांच्या प्रगतीसाठी आपण एकत्र यायला हवं. या विचारालाच जग हिंदू विचार मानते. हाच भारताचा परंपरागत विचार आहे. लोकं म्हणतात आम्ही हिंदूत्ववादी आहोत. परंतु आम्ही परंपरेने हिंदुत्ववादी आहोत, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सर्वांचा विचार करतो आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असंही ते यावेळी म्हणाले.