परभणी – गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढल आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच धरणे फुल भरली आहे. परभणी जिल्यातील येलदरी धारण देखील फुल भरले आहे. त्यामुळे येलदरी धरणाचे आता सर्वच दरवाजे दोन मीटर उघडून 87 हजार 97.60 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे सेनगाव- जिंतूर हा राज्यमहामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात सोडलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात होणारी आवक यामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने तीन तासांपूर्वी धरणातून एकूण 53 हजार 636.76 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. परंतु आवक वाढतच असल्यामुळे रात्री अकरा वाजता धरणाचे सर्वच म्हणजे दहाही वक्रद्वार दोन मीटर उघडून त्याद्वारे 84 हजार 393.60 आणि विद्युत निर्मितीद्वारे 2700 याप्रमाणे एकूण 87 हजार 393.60 क्युसेक्स (2466.23 क्युमेक्स) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे येलदरी धरण पूरनियंत्रण कक्षाकडुन नदी काठच्या गावांना सावधानता बाळगण्याचा वेळोवेळी इशारा दिला आहे. तरीपण प्रचंड विसर्गामुळे पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रात मोठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीकाठची पिके तर गेल्यातच जमा आहे. शिवाय अनेक गावे प्रभावित होतील.
मंगळवारी संध्याकाळी उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून 1 लाख 7 हजार 769 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे येलदरी व सिध्देश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने येलदरी व सिध्देश्वर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क राहून नदीपात्रात कोणीही उतरू नये. वाहने, जनावरे सोडू नये किंवा कोणतीही वित्त अथवा जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पूर्णा पाटबंधारे विभागाचे (वसमत) कार्यकारी अभियंता यांनी पूरप्रवण क्षेत्रातील गावांना दिला आहे.