लखनऊ । गेल्या ७ महिन्यांपासून उत्तर प्रदेश पोलिसांकडून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या डॉ. कफील खान यांच्या तत्काळसुटकेचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेत. गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजचे प्रवक्ते आणि बालरोग विशेष तज्ज्ञ डॉक्टर कफील खान यांना सीएए, एनआरसी आणि एनपीएच्या विरोधा दरम्यान अलिगढ विद्यापीठात १३ डिसेंबर २०१९ रोजी कथितरित्या भावना भडकावणारं भाषण देण्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती.
कोर्टानं राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) डॉ. कफील यांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी, कोर्टानं अटकेच्या मुदतवाढीवरही आक्षेप घेत हे बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. कफील खान यांना अटक करणं आणि अटकेचा कालावधी वाढवणं हे बेकायदेशीर आहे. त्यांची ताबडतोब सुटका करण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयानं आदेश सुनावताना दिले आहेत.
उच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशानंतर डॉ. कफील खान यांच्या पत्नी शबिस्ता खान यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘कफील खान यांचं आयुष्य सात महिन्यांपासून त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आलं. ते आता कुणीही त्यांना परत देऊ शकत नाही. एका निर्दोष व्यक्तीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लावून तुरुंगात टाकून ७ महिने त्याचा छळ करण्यात आला. जर तुमच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारखी शक्ती असेल तर त्याचा गैरवापर करू नका’ असंही शबिस्ता खान यांनी म्हटलंय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.