हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईमधील रहिवाशांचे आता घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण, सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेंतर्गत १५ फेब्रुवारी रोजी तळोजा नोडमध्ये २६ हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. विक्रीविना राहिलेल्या घरांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी आणि विक्रीला चालना देण्यासाठी सिडकोने (CIDCO) ही सोडत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाचे म्हणजे, यापूर्वी सिडकोने खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, कळंबोली, बामणडोंगरी, खारकोप आणि मानसरोवर या भागांमध्ये परवडणाऱ्या घरांची विक्री योजना जाहीर केली होती. या योजनेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून तब्बल दीड लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २१,३९९ अर्जदारांनी बुकिंगची रक्कम भरली आहे. त्यामुळे पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता ग्राहक फक्त सोडतीची वाट पाहत आहेत.
तळोजातील घरे विक्रीविना
सिडकोने उभारलेल्या काही गृहप्रकल्पांमधील घरे विक्रीविना पडून आहेत. यात तळोजा नोडमध्ये जवळपास ५,००० घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याठिकाणी अपेक्षित मागणी नसल्यामुळे सिडकोच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ग्राहकांना या घरांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि सोयीसुविधांची माहिती देण्यासाठी ही सोडत प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे.
दरम्यान, ही सोडत तळोजा नोडमधील पाचनंद सेक्टर २८ येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामुळे इच्छुक नागरिकांना याठिकाणी प्रत्यक्ष येऊन संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेता येणार आहे. तसेच, अधिकाधिक नागरिक या प्रक्रियेत सहभागी होतील. सिडकोच्या या उपक्रमामुळे विक्रीविना पडून असलेल्या घरांना मागणी निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.