औरंगाबाद | जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’च्या शासन आदेशानंतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत. यामुळे लाखो दुकानदार व कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने कोरोनाचे नियम पाळत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, दुकानदारांना आर्थिक पॅकेज द्यावे, दुकाने उघडण्याची परवानगी दिली नाही तर सामूहिक आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापा-यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदन देवून केली आहे.
औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी शासनातर्फे अनेकवेळा बाजारपेठ बंदचे आदेश देण्यात आले. आदेशानुसार व्यापारी बांधवांनी आपाआपली दुकाने बंद ठेवून आदेशाचे पालन केले. यामध्ये व्यापाऱ्यांचे एका वर्षात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही व्यापारी कर्जबाजारी झाले तरीही वेळोवेळी विविध करांचा भरणा केला. बँकेचे व्याज भरणे, दुकान भाडे देणे, कामगारांना पगार, जास्तीचे लाईटबील भरणे, महापालिकेच्या मालमत्ता कर व्याजासहित भरण्याचा प्रयत्न केला आहे.
शासनाकडून आतापर्यंत कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. किंवा करात किंवा व्याजदरात सूट नाही उलट 30 एप्रिलपर्यंत पुन्हा बाजारपेठ बंद करण्याचे आदेश काढून जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. बाजारपेठ पुन्हा सुरू करा, अथवा व्यापा-यांना त्वरित मदत देण्यात यावी, अन्यथा सामुहिक आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी अजय शाह, प्रफुल्ल मालाणी, विजय जैस्वाल, लक्ष्मीनारायण राठी, पवन साकला, आशिष बाहेती, सुभाष पुजारी, अनंत बोरकर हे व्यापारी उपस्थित होते.