सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील मोळाचा ओढा येथील शहीद संतोष महाडीक पोलीस चौकी शेजारी चक्क 2 ट्रक भरून दिव्यांगांच्या व्हील चेअर भंगारात देण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून या व्हील चेअर पॅकपीस असल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे आणि दिव्यांग प्रेरणा ग्रुपच्या सदस्या धनावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
सातारा शहरात दिव्यांगांना वाटप न करता अशाप्रकारे भंगारात पॅकपीस टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नक्की कोणत्या शासकीय विभागातून हे भंगारात टाकले आहेत की अन्य कोणत्या ठिकाणाहून पॅकपीस पाठवले आहेत. या प्रकरणाचा शोध घेणे गरजेचे असून अशाप्रकारे व्हील चेअर पॅकपीस भंगारात रूपयाच्या भावाने का विकले गेले हाही प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. तसेच रात्रीच्या वेळी बाराच्या सुमारास ट्रकमधून व्हील चेअर आणल्याने नक्की याबाबत काय गोलमाल आहे, यांचा शोध घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्याकडून केली जात आहे.
साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला असून याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे. यामध्ये दोषींवर कारवाई करून या व्हील चेअर जप्त करून त्या गरजू दिव्यांगांना देण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास भंगार व्यावसायिकाने नकार दिला आहे.