सातारा | मी कोणत्याही पक्षात असलो तरी विकासकामांत कुठेही अडचण आलेली नाही आणि कधी येणारही नाही. जे लोक तालुक्यात कार्यरत आहेत, तुमच्या सुखदुखात तुमच्या सोबत आहेत त्यांच्या बरोबर, त्यांच्या पाठीशी ठाम रहा. मृगजळ बनून बाहेरून येणाऱ्यांच्या पाठीमागे धावू नका. राजकारणापेक्षा जावलीच्या विकासाला कायम प्राधान्य दिले असून जावलीतील जनतेला सोडून मी कधीही जाणार नाही, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीकरांना दिला.
सर्जापुर ग्रामपंचायतीच्या नुतन बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपूजन तसेच बर्गे वस्ती रस्ता खडीकरण, सटवाई रोडचे डांबरीकरण व लसीकरण कँम्पचे उदघाटन अशा विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जावलीचे उपसभापती सैारभ शिंदे, माजी सभापती अरूणा शिर्के, जयदिप शिंदे, प्रकाश मोहिते, सरपंच सौ. स्वागता बोराटे, उपसरपंच शंकर मोहिते, देविदास बोराटे, मयुर बाबर, सारिका मोहिते, सुरेखा मोहिते, मनिषा बोराटे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, गेल्या 12 वर्षापासून जावलीच्या जनेतेसाठी मी झटत आहे. विकासकामांत मी कधीच सातारा जावली असा भेदभाव केला नाही व कधी करणारही नाही. विकासकामांबरोबरच तालुक्यातील सर्व अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला आहे. तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असून जो खऱ्या अर्थाने तुमची कामे करतो त्याच्या पाठीशी कायम रहा. सुत्रसंचालन अतुल बोराटे यांनी केले. प्रास्ताविक नितिन मोहिते यांनी केले. आभार किर्तनकार नलावडे यांनी मानले.