हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Alyad Palyad Marathi Movie) संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध जाती जमातीचे लोक राहतात. त्यामुळे येथे सगळ्याच बाबतीत वैविध्य पहायला मिळते. जुन्या संस्कृती, प्राचीन रूढी- परंपरा, विचित्र प्रथा आणि ज्या त्या भागातील लोकांच्या विविध समजुतींविषयी आपण कायम काही ना काही ऐकत वाचत असतो. अशातच एका अत्यंत वेगळ्या आणि भयावह परंपरेची आराधना करण्याची प्रथा असलेल्या गुरगां भागातील एका गावाची आणि तिथे राहणाऱ्या माणसांची एक थरारक गोष्ट घेऊन ‘अल्याड पल्याड’ हा मराठी चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा नुकताच एक टिझर समोर आला आहे. जो पाहून अंगावर काटा येईल.
‘अल्याड पल्याड’चा नवा टिझर प्रदर्शित (Alyad Palyad Marathi Movie)
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळी वेगळी कथा पहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळतेय. नुकताच या चित्रपटाचा नवा टिझर प्रदर्शित झाला आहे.
ज्यामध्ये अभिनेता संदीप पाठकच्या भूमिकेची एक झलक पहायला मिळते आहे. काळी जादू, बाहुल्या, कुंकू, रिंगण अशी भीतीदायक दृश्ये, किंकाळ्या आणि बॅकग्राऊंडला सुरु असलेले म्युझिक अंगावर एकच काटा उभा करत आहे.
‘हे’ कलाकार साकारणार मध्यवर्ती भूमिका
चित्रपटाच्या शीर्षकासह ‘परत आला करनटक्याचा काळ..’ लिहिलेले पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट काहीसा वेगळा असणार याची खात्री पटली होती. (Alyad Palyad Marathi Movie) यानंतर आता जेव्हा टिझर समोर आला आहे तेव्हा मात्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या चित्रपटातून एक चांगली स्टारकास्ट आपल्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठकसह दिग्गज अभिनेते मकरंद देशपांडे, MHJ फेम गौरव मोरे, माधुरी पवार, सुरेश विश्वकर्मा, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन आणि अनुष्का पिंपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
एस. एम. पी. प्रोडक्शन अंतर्गत ‘अल्याड – पल्याड’ हा चित्रपट येत्या १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील आहेत. चित्रपटाची कथा देखील एस के पाटील यांचीच आहे. तर पटकथा आणि संवाद संचय नवगिरे यांचे आहेत. (Alyad Palyad Marathi Movie) छायांकन योगेश कोळी यांचे आहे. तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. वेशभूषा अपेक्षा गांधी आणि ध्वनी स्वरूप जोशी यांचे आहे. हा चित्रपट एका वेगळ्या कथानकासह प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी आशा चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली आहे.