अमरावती प्रतिनिधी । सर्वांचे लक्ष लागून असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन विभागात पेंडालमध्ये परीक्षकांकडून मूल्यांकनाची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. काल म्हणजेच शुक्रवारीतब्बल ८१० परीक्षाकांनी उपस्थिती लावली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षकांनी उपस्थिती दर्शविल्याने पेंडालदेखील मूल्यांकनास कमी पडला असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्याच्या दिवसापासून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे हि नियमावली आहे. मात्र एवढे असून देखील अमरावती विद्यापीठात काही वर्षांपासून निकाल वेळेत जाहीर केले जात नाही. त्यामुळे परीक्षा व निकालात त्रुट्या, अनुपस्थिती असलेल्या परीक्षकांना पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद, अशी कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे हिवाळी २०१९ परीक्षेदरम्यान केंद्रावर केंद्राधिकारी, सहकेंद्राधिकाऱ्यांसह परीक्षकांनी मूल्यांकनास उपस्थिती दर्शविली.
यावेळी परीक्षा विभागात प्राध्यापकांची जणू यात्रा भरली होती का असे चित्र उभे राहिले होते. अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यांतून गर्दी झाल्याने परीक्षा विभागात मूल्यांकनास जागा अपुरी पडली. त्यामुळे परीक्षा विभागाने तात्काळ छतावर पेंडाल टाकला. गुरूवारपासून परीक्षकांनी पेंडालमध्ये मूल्यांकन सुरू केले आहे. शुक्रवारी पेंडालमध्येसुद्धा परीक्षकांना जागा अपुरी पडली. परिणामी परीक्षा विभागात मिळेल त्या ठिकाणी टेबल टाकून परीक्षकांना मूल्यांकन करावे लागले. सध्या काही विभागांच्या परीक्षा देखील विद्यापीठात सुरु आहेत. त्यामुळे एकीकडे परीक्षा अन दुसरीकडे मूल्यांकन असे चित्र सध्या येथे पहायला मिळत आहे.