औरंगाबाद | डॉक्टरने मृत घोषित केल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत आणून महिलेला सरणावर ठेवले खरे, परंतु डोळ्यावर पाणी पडताच ही महिला जिवंत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपस्थितांत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ही घटना कन्नड तालुक्यातील आंधानेर येथे काल संध्याकाळच्या सुमारास घडली. जिजाबाई गोरे (रा. अंधानेर) असे या ७५ वर्षीय वृध्द महिलेचे नाव आहे.
आजारी असल्यामुळे उपचार करण्याकरिता सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिजाबाई गोरे यांना नातेवाईकांनी गावातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. या महिलेची तपासणी केल्यानंतर तिला डॉक्टर मृत घोषित केले. त्यानंतर सर्व जवळच्या नातेवाईकांना या महिलेच्या निधनाची वार्ता कळविण्यात आली. पाहुणे मंडळी गावात आल्यानंतर गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूतीत अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी करून कन्नड शहरातून स्वर्गरथ मागविण्यात आला. त्यानंतर घरी सर्व क्रिया करण्यात येऊन वाजत गाजत या महिलेला रात्री नऊ वाजता स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यानंतर महिलेस लाकडाच्या सरणावर ठेवण्यात येऊन चारी बाजूने रॉकेलचा शिडकावा करण्यात आला. शेवटी पाणी पाजण्याची क्रिया सुरू असताना या महिलेच्या डोळ्याच्या पापणीवर पाणी पडले. त्यानंतर मात्र महिलेने डोळ्याची उघडझाप केली. हा सर्व प्रकार स्मशानभूमीत अंधार असल्याने लवकर दिसला नाही. परंतु एका व्यक्तीने बॅटरीचा उजेड केल्यानंतर ही महिला जिवंत असल्याचे निदर्शनास आले. लगेच पुढील कार्यक्रम थांबविण्यात आले. महिलेच्या अंगावर रचलेली लाकडे काढण्यात आली.
यामुळे महिलेची हालचाल वाढली अन् चक्क ती महिला उठून बसली. यामुळे सुरू असलेली नातेवाईकांची रडारड थांबली. महिलेस सरणावरून खाली घेण्यात येऊन तत्काळ शहरातील डॉ. मनोज राठोड यांच्या दवाखान्यात उपचाराकरिता आणले. ही महिला जिवंत असून हृदय सुरू आहे मात्र, ब्रेन डेड असून त्या कोमात गेल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.