MBBS चा युक्रेन पॅटर्न अभ्यासणार, युक्रेन पॅटर्नची महाराष्ट्राकडून दखल : अमित देशमुख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आपल्या देशातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBS च्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेले आहेत. त्यांना परत मायदेशी आणले जात आहे. युक्रेनमधील वैधकीय शिक्षण अंडी भारतातील वैद्यकीय शिक्षण यावरून काँग्रेस नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महत्वाचे विधान केले आहे. युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण भारताच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आणि दर्जेदार आहे. त्यामुळे आता युक्रेनमधील स्वस्त आणि दर्जेदार MBBS च्या पॅटर्नचा अभ्यास करणार, असे देशमुख यांनी म्हंटले आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, देशातील तब्बल 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी जात असल्याचे दिसून आले आहे. मराठवाड्यासह राज्यातील हजारो तरुण युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेले असल्याचे युद्धामुळे समोर आले. यापूर्वी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्यांची संख्या एवढी मोठी आहे, हे माहितीच नव्हते.

युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणातील शुल्क रचना आणि महाराष्ट्र राज्यातील शुल्क रचना याची माहिती घेतली जाईल. सध्या शुल्क रचनेला कायद्याचा आधार आहे. मात्र, युक्रेनमधील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांची आवश्यक ती नोंद राज्य सरकारने घेतली आहे. त्याबाबतचा अहवाल तयार झाल्यानंतरच पुढे अधिक माहिती दिली जाईल, असे मंत्री देशमुख यांनी म्हंटले.