हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी शरद पवार (Sharad Pawar)आहेत. जेव्हा जेव्हा राज्यात भाजपचं सरकार आलं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आला मात्र शरद पवार यांचं सरकार आल्यानंतर मराठ्यांचं आरक्षण जातं असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात महाराष्ट्र भाजपकडून अधिवेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.
अमित शाह म्हणाले, शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत. या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. अशी टिका अमित शाह यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार येतं, मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांचे सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं असा आरोप शाह यांनी केला.
मी हे सगळ विचार करुन बोलतोय. महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकलं. मध्यंतरी शरद पवार यांचं सरकार आलं, मराठा आरक्षण गायब झालं. त्यानंतर आम्ही पुन्हा आलो. आम्ही आतासुद्धा मराठा आरक्षण देण्याचं काम केलं आहे. परंतु शरद पवार यांचं सरकार येईल, तेव्हा मराठा आरक्षण पुन्हा गायब होईल असं म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. लोकसभेला खोटा प्रचार महाविकास आघाडीने केला मात्र आता माझा कार्यकर्ता हुशार झाला आहे. त्याला तुमच्या खोट्या प्रचाराची जाणीव झाली आहे. आता तुमचा खोटा प्रचार चालणार नाही. 2024 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.