टीम हॅलो महाराष्ट्र। जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं आहे. चेहरे बांधलेल्या अवस्थेत गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे व्हिडियो व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. जेएनयूतील हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं दिल्ली पोलिसांशी बोलणं झालं असून याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पोलीस सहआयुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची चौकशी करण्याचे तसेच लवकरात लवकर याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश शाह यांनी दिले आहेत, असे एएनआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या हल्ल्याबाबत विद्यापीठाचे निबंधक प्रमोद कुमार यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे. देशभरातील बुद्धिवंत, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विरोधी पक्षांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हल्ल्यामागे केंद्रातील सत्ताधारी भाजपचा हात असल्याचा आरोप आप’सह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.