१ जून नंतर लोकडाऊन वाढणार? अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई । कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी १ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. देशातील लॉकडाउनच चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. मात्र आता १ जून नंतर काय याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. सरकारकडून लॉकडाउन वाढवण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा फोनवरून चर्चा केली आहे. पीटीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.

अमित शाह यांनी लॉकडाउन पुढे वाढवण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी पहिल्या लॉकडाउनची घोषणी केली होती. २१ दिवसांसाठी हा लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. सुरुवातीला हा लॉकडाउन ३ मे आणि त्यानंतर १७ मे पर्यंत वाढवण्यात आला. चौथ्या टप्प्यात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाउनचा चौथा टप्पाही ३१ मे रोजी संपत असून त्यामध्ये वाढ करायची की नाही किंवा निर्बंध शिथील करायचे यासंबंधी केंद्र सरकार चर्चा करत आहे. याचाच भाग म्हणून अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, येत्या तीन दिवसात सरकार याबाबत काहीतरी घोषणा करण्याची शक्यता आहे. १ जून नंतर देशातील काही भागात हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो असं सूत्रांकडून समजत आहे. तसेच लॉकडाऊनचे नियम अजून शिथिल केले जातील असंही बोललं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.