राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षफुटीबाबत अमित शहांचा सर्वात मोठा दावा; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) चार टप्पे पार झाल्यानंतर आता पाचव्या टप्प्यांमध्ये मुंबई, नाशिक, ठाणे, धुळे या भागात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा धुळे दौरा झाला. या दौऱ्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीवर आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर, हे दोन्ही पक्ष नेमके कोणत्या कारणासाठी फुटले याचे कारण देखील माध्यमांना सांगितले.

माध्यमांशी बोलताना अमित शहा म्हणाले की, “शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणायचं आहे. जर शरद पवार यांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते. पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपावर लावला जात आहे.”

इतकेच नव्हे तर, “गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सहमती दर्शविली होती. निवडणुकीनंतर त्यांच्या मनात मुख्यमंत्री बनण्याचा मोह आला. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांना सोडून ते काँग्रेस आणि शरद परवारांसोबत गेले. आज औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. त्याला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन बसले आहेत. त्यामुळे आज बाळासाहेबांचा आत्मा दु:खी झाला असेल की नाही” असाच सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.