Wednesday, February 1, 2023

रजनीकांत यांनी बिग बींच्या ‘त्या’ सल्ल्याकडे केले दुर्लक्ष…

- Advertisement -

चंदेरीदुनिया । बिग बी या नावाने ओळखले जाणारे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना तीन मोलाचे सल्ले दिले. मात्र, त्यातील एका सल्ल्याकडे रजनी यांनी दुर्लक्ष केले. तो सल्ला होता राजकारणात एन्ट्री न करण्याचा…

येथे पत्रकारांशी बोलताना 69 वर्षीय रजनी यांनी स्वत:च ती माहिती दिली. माझ्यासाठी बच्चन म्हणजे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी मला वयाच्या साठीत प्रवेश करताना तीन सल्ले दिले होते. पहिला सल्ला नियमित व्यायाम करण्याविषयी होता. लोक काय म्हणतील याचा विचार न करता मनाला वाटेल ते करा. पण, सतत व्यस्त रहा, असा त्यांचा दुसरा सल्ला होता. त्यांनी तिसरा सल्ला दिला तो राजकारणात प्रवेश न करण्याचा.

- Advertisement -

त्यांनी दिलेल्या पहिल्या दोन सल्ल्यांनुसार मी वागतो. मात्र, त्यांचा तिसरा सल्ला मी विशिष्ट परिस्थितीमुळे आचरणात आणू शकलो नाही, असे रजनी यांनी नमूद केले. रजनी यांनी याआधीच राजकारणात सक्रिय होण्याची घोषणा केली आहे. ते पक्ष स्थापन करून तामीळनाडूत 2021 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांना सल्ला देणारे बच्चन स्वत: काही काळ राजकारणात सक्रिय होते. मात्र, ते क्षेत्र न मानवल्याने बच्चन राजकारणातून बाहेर पडले.