हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन दिवसापूर्वी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी विशेषतः काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अनपेक्षित पराभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला. त्यावर आता संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना उत्तर दिले आहे. “संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते, मतांच्या माध्यामतून जनतेन परिवर्तन करून दाखवले. हे सत्य तुम्हाला समजेल! बाकी कोणाच्या तरी सांगण्यावरून पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मी संगमनेर मध्ये आमंत्रित करतोय.” असा टोला खताळ यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, “बाळासाहेब थोरात हे नेहमीच मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. ७० ते ८० हजार मताधिक्याने जिंकणारे थोरात यंदा अवघ्या १० हजार मतांनी पराभूत झाले, हे शक्य आहे का? पुढे त्यांनी ही निवडणूक लोकशाहीसाठी धोकादायक असून, लोकांनी दिलेली मते कुठेतरी गायब झाल्याचा संशय व्यक्त करत निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरून थोरात यांचा पराभव करणाऱ्या अमोल खताळ यांनी राज ठाकरेंना उत्तर दिले आहे.
अमोल खताळ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, “संगमनेरच्या जनतेने पाणीटंचाई, बेरोजगारी, अपूर्ण विकास व जनतेकडे दुर्लक्ष यामुळेच ४० वर्षांपासून निवडून दिलेल्या बाळासाहेब थोरात यांना नाकारलं आहे. ४० वर्षे आमदार, १७ वर्षे मंत्री असून पण तालुक्यात साधी MIDC नाही, शेतीला पाणी नाही. मग जनतेने मत का द्यावी?” असा प्रश्न खताळ यांनी विचारला आहे. याच ट्विटमध्ये खताळ पुढे म्हणतात की, “राजसाहेब मुंबईच्या बाहेर या, संगमनेर पाहा, संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते, मतांच्या माध्यामतून जनतेन परिवर्तन करून दाखवले. हे सत्य तुम्हाला समजेल! बाकी कोणाच्या तरी सांगण्यावरून पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मी संगमनेर मध्ये आमंत्रित करतोय.” त्यामुळे अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना उत्तर देत असतानाच थोरात यांच्या ४० वर्षाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
https://x.com/amolkhatalpatil/status/1885536216373748025