हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षांपासून देशातील वाहतूक आणि दळणवळण सोप्प झालं आहे. देशातील रस्ते आणि रेल्वे ट्रॅक मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होत आहे. केंद्र सरकार कडून अजूनही नवनवीन योजना आणि प्रोजेक्ट सुरु आहेत. भारतात वंदे भारत एक्सप्रेस नंतर अमृत भारत ट्रेन (Amrit Bharat Express) चालवण्यात येत आहे. सध्या तरी देशात फक्त २ अमृत भारत ट्रेन धावत असून या आर्थिक वर्षात 50 अमृत भारत ट्रेन रुळावर आणण्याची रेल्वेची योजना आहे.
खर्च असणार कमी – Amrit Bharat Express
अमृत भारत ट्रेन या नॉन-एसी गाड्या आहेत आणि त्यामध्ये द्वितीय श्रेणीचे, अनारक्षित डबे आणि स्लीपर कोच यांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आधी नमूद केले की आगामी अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये देशभरातील विविध मार्गांवर सेवा देणारे वातानुकूलित (एसी) आणि नॉन-एसी दोन्ही डबे असतील. महत्वाची गोष्ट म्हणजे अमृत भारत ट्रेनचे तिकीट परवडणारे असण्याची अपेक्षा आहे. उदाहरणार्थ, 1,000 किमी प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे 454 रुपये मोजावे लागतील.
अहवालानुसार, अमृत भारत ट्रेनमध्ये 22 डबे आहेत, ज्यामध्ये अनारक्षित प्रवाशांसाठी 8 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, 12 द्वितीय श्रेणीचे 3-स्तरीय स्लीपर कोच आणि दोन गार्ड डब्यांचा समावेश आहे. अमृत भारत ट्रेन ही LHB पुश-पुल ट्रेन आहे, जिच्या दोन्ही टोकांना चांगल्या प्रवेगासाठी लोकोमोटिव्ह आहेत. ट्रेनचे डिझाईन अतिशय छान आणि आकर्षक आहे. साहित्य ठेवायला मोठी जागा यामध्ये मिळतेय. बसायला चांगल्या आणि आधुनिक सीट्स आहेत. मोबाईल चार्जिंगसाठी सॉकेट आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा , एलईडी लाईट्स यांसारख्या सुविधा सुद्धा अमृत भारत ट्रेनमध्ये (Amrit Bharat Express) प्रवाशांना मिळतात.




