कराडच्या रूग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आल्याबाबतचा ईमेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह व लोकप्रतिनिधी यांना ईमेल केलेला आहे. त्यामध्ये कराड येथील कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला असून त्याबाबत माहीती घेवून पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

प्रमोद पाटील यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे की, राज्यात, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. कराड तालुक्यात देखील रुग्ण वाढताना दिसत आहेत. आधी रेमडीसीव्हीर इंजिक्शनचा तुटवडा सूरु असतानाच, आता कराडमध्ये एक नवीनच संकट उभे ठाकले आहे. कोरोना मध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल झपाट्याने कमी होते. अशा स्थितीत रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मधील ऑक्सिजन लावून ऑक्सिजन लेव्हल स्थिर ठेवण्याचे प्रयत्न सुरु असतात. तेव्हा कराडमधील बऱ्याच कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला आहे.

सध्य स्थितीतील साठा केवळ एक किंवा दोन दिवस पुरेल एवढाच आहे. काही रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून मोठ्या मशीन उपलब्ध होत आहेत का याची विचारणाही केली आहे, असे समजते. तसेच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनींच्या गाड्या कोल्हापुरात वेटिंग वर आहेत असे समजते. परिस्थिती अजून बिकट होण्याअगोदर आपण माहिती घेऊन प्रशासकीय पातळीवर हालचाली करून ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये. यासाठी लवकरात लवकर हालचाली करणे गरजेचे आहे. यामुळे कोरोना रुग्णांसमोर संकट उभे राहणार नाही. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन कमी पडणार नाही. तरी आपण यावर माहिती घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा ईमेल प्रमोद पाटील यांनी केलेला आहे.

लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे आमच्या मागणीकडे दुर्लक्ष ः प्रमोद पाटील

कालपासून मोठी समस्या कराड शहरात भेडसावत आहे. अनेक रूग्णालयात कालपासून ऑक्सिजन कमी पडत असल्याचे सांगत होते. आम्ही आज समाजातील सामाजिक घटकांच्याकडून ऑक्सिजन मशीन गोळा करत आहोत. तरी जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर कराड तसेच सातारा जिल्ह्यातील रुग्णालयात लक्ष देवून ऑक्सिजन पुरवठा करावा. आम्ही लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील अनेकांना संपर्क केला पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. कराड मधील एरम हाॅस्पीटल, राजश्री हाॅस्पीटलमध्ये ऑक्सिजन संपत आलेला आहे, अशी माहिती दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी दिली.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment