हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण अनेकवेळा मित्राकडे खर्चासाठी उसने पैसे मागत असतो. मात्र, कोणी पैसे देतो तर कोणी नाही. मात्र, जेव्हा पैसे देत नाही तेव्हा अनेकदा आपण मित्राला बोलून सोडून देतो. मात्र, सातारा जिल्ह्यात उसने पैसे दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाला तिघा जणांकडून मारहाण करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरात घडलेल्या घटनेप्रकरणी सुशांत संदीप ढवळे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार साईराज निकम, निरंजन ढोणे (पूर्ण नाव नाही, दोघेही रा. ढोणे काॅलनी, सातारा) आणि निखिल जाधव (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
दि. १९ एप्रिल रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास रविवार पेठेत हा प्रकार घडला. उसने पैसे न दिल्याच्या रागातून संशयितांनी सुशांत ढवळे याला शिवीगाळ करून हाताने तसेच दगडाने मारून जखमी केले. तसेच गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत तक्रारदाराच्या डाव्या डोळ्याला तसेच डोक्यात मार लागला आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार खलिफा हे तपास करीत आहेत.