सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सध्या सातारा जिल्ह्यात किरकोळ कारणांवरून थेट बंदुकीतून गोळीबार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाटण तालुक्यात माजी नगरसेवकाची गोळीबाराची घटना ताजी असताना आता पुन्हा तालुक्यातील एका गावात लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत एक मागून एक अशा तीन फैरी झाडल्या. तळमावले येथे गुरुवारी सकाळी 9:30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर एकच गोंधळ उडून गेला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत त्याच्या जवळील परवानाधारक बारा बोअरची रायफल व 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील तळमावले गावाच्या हद्दीत ढेबेवाडी ते कराड जाणाऱ्या रस्त्यावर काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या गेटसमोर एका लग्नाची मिरवणूक सुरु होती. लग्नाच्या मिरवणुकीवेळी एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडोळ्या. यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पाटणचे डीवायएसपी विवेक लावंड यांच्यासह ढेबेवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी गोळ्या झाडणाऱ्या जितेंद्र जगन्नाथ कोळेकर (वय 51, रा. तळमावले) याला ताब्यात घेतले. तळमावले येथील जितेंद्र कोळेकर याच्याकडे स्वसंरक्षणाची परवानाधारक बारा बोअरची रायफल आहे. त्याने लग्नाच्या मिरवणुकीवेळी त्या रायफलचा गैरवापर करून हवेत 3 फ़ैरी झाडल्या.
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बंदुकीतून हवेत गोळीबार करत सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच दहशतीचे वातावरण निर्माण करून इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल, अशी कृती केली. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात आठवड्यात तिसरी घटना
सातारा जिल्ह्यात गत आठवडाभरातील तिसरी घटना असून पाटण तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. अशा गोळीबाराच्या घटनांमुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित अबाधित रहावी, कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हयात घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी सातारा जिल्हा स्थलसिमा हददीत शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे मनाई आदेश दि. 22 रोजी 6 वाजल्यापासून ते दि. 5 एप्रिलपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत सातारा जिल्हयात लागू केला आहे.