कोविड लसीकरणासाठी जाणारी वृद्ध महिला विचित्र अपघातात ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोविडचा दुसरा डोस घेण्यासाठी मुलीसह भाचीसोबत पायी जात असलेल्या वृध्देला दुचाकीने धडक दिल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव जीपने चिरडले. या विचित्र अपघातात वृध्देचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. हा अपघात हडको कॉर्नरसमोर गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला.

गौरी तपनकुमार मंडल वय 56 (रा. एन-१३, भरतनगर, हडको) असे अपघातातील मृत वृध्देचे नाव आहे. भरतनगरातील गौरी मंडल या सकाळी मुलगी व बहिणीच्या मुलीसोबत कोविड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पायी जात होत्या. तेव्हा हडको कॉर्नर समोरील दुभाजक ओलांडत असतानाच समोरुन भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने गौरी यांना धडक दिली.

त्यामुळे खाली पडलेल्या गौरी या उठण्याच्या प्रयत्नात असतानाच दुचाकीच्या पाठोपाठ आलेल्या जीप (एमएच-०४-ईएस-६५७९) चालकाने गौरी यांना चिरडले. हा अपघात घडताच दोन्ही वाहनधारकांनी तेथून पळ काढला. या अपघातानंतर गौरी यांना तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी गौरी यांच्या मुलीच्या तक्रारीवरुन जीप चालकाविरुध्द सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सय्यद बाबर करत आहेत.

Leave a Comment