खटाव | सातारा जिल्ह्यातील मायणी येथील वन उद्यान व पक्षी आश्रयस्थान परिसरात माॅर्निंग वाॅकसाठी गेलेल्या मुलींना अज्ञात दुचाकी वाहनाने धडक दिली. यामध्ये विद्या राजकुमार हिंगसे (वय -18 वर्षे) ही युवती जागीच ठार झाली. तर तिच्यासोबत असणारी दिव्या काशिनाथ तोडकर (वय -15 वर्षे, दोघीही रा.मायणी, ता. खटाव) ही जखमी असून तिला पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून पुढे विटा येथे पाठविण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलीस पाटील यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मायणी येथील नवीपेठ श्री. सद्गुरू सरुताई माऊली मठाच्या परिसरात राहणाऱ्या मुली मॉर्निंग वॉकसाठी येथील वन उद्यान व पक्षी आश्रयस्थान परिसरामध्ये पहाटे 5. 30 वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. त्या पक्षी आश्रयस्थान परिसरात आल्यानंतर अज्ञात वाहनाने धडक दिली.
या धडकेमध्ये विद्या राजकुमार हिंगसे हिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे ती जागीच ठार झाली. तर तिच्यासोबत असलेल्या इतर महिला व मुलींमधील दिव्या काशिनाथ तोडकर ही गंभीर जखमी झाली. दिव्या तोडकर हिच्या आईलाही किरकोळ दुखापत झालेली आहे. तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयातुन विटा (जिल्हा. सांगली) येथील खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दुचाकी चालक फरार
मायणीत मार्निंग वाॅकला 4 ते 5 मुली गेलेल्या होत्या. यावेळी वेगाने आलेल्या दुचाकी चालकाने विद्या हिंगसे हिला जोराची धडक दिली. यावेळी तेथे असलेल्या एका मुलींने धाडसाने त्या दुचाकी चालकास पकडले होते. मात्र विद्या व दिव्या या मुलींना जबर मार लागल्याने दुचाकी चालकाने मुलींच्या हातातून सुटका घेवून पळ काढला.