अखेर आनंद महिंद्रा यांनी खरा केला आपला शब्द, देवराष्ट्रेतील दत्तात्रय लोहार यांना दिली बोलेरो गाडी भेट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी भंगारात पडलेल्या वस्तूंपासून अफलातून मिनी जिप्सी गाडी बनवली होती. गाडीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर पसरल्यानंतर या गाडीचे लाखो दिवाने झाले होते तर खुद्द महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा हे सुद्धा या चाहते झाले आहेत. ही गाडी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहार यांच्यावर ते इतके खुश झाले की त्यांनी दत्तात्रय लोहार यांना बोलेरो गाडी भेट देण्याचे घोषित केले होते.

त्यानुसार युवा नेते विशाल पाटील, माजी खासदार प्रतिक पाटील युव नेते जितेश कदम व कंपनीचे अधिकारी मुनाफ काझी यांच्या उपस्थितीत घोषणेची पुर्तता करण्यात आली. देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांची परिस्थिती बेताचीच आहे, थोडीसी शेती व छोटासा फॅब्रीकेशनचा त्यांचा व्यवसाय आहे. याद्वारेच ते आपल्या आयुष्याची गुजरान करत आहेत. अशातच मुलाने चारचाकी घेण्याचा हट्ट केला मात्र आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला चारचाकी गाडी घेण्याचे शक्य नसल्याचे त्यांनी ओळखले.

परंतु त्यांनी परिस्थिती पुढे न झूकता आपल्या फॅब्रिकेशनच्या दुकानात पडलेल्या भंगारातील वस्तूंपासून चार चाकी गाडी बनवली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी गाडीचा व्हिडिओ बघितल्यानंतर ते इतके खुश झाले की, त्यांनी ही गाडी बनवलेल्या दत्तात्रय लोहार यांना आपल्या कंपनीची बोलेरो गाडी भेट देण्याचे घोषित केले व त्यांची मिनी जिप्सी आपल्या कंपनीच्या कार्यालयात ‘आवर्षणग्रस्त व्यक्ति कसे काम करतात याचे उदाहरण म्हणून ठेवणार असल्याचे घोषित केले होते.’ त्यानुसार आज आपन दत्तात्रय लोहार यांना बोलेरो गाडी भेट दिली.