सोलापूर प्रतिनिधी । सोन्याच्या हव्यासापोटी सोलापूर जिल्हयातील पंढरपूरमध्ये चक्क मृतांच्या रक्षा चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसत आहेत. येथील स्मशानभूमीत मृत व्यक्तीच्या अंगावरील सोन्याचे दागिणे मिळवण्यासाठी चोरांनी चक्क रक्षा चोरीचा फंडा अवलंबला आहे. वाढत्या रक्षा चोरीमुळे मृताची विटंबना केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण नीर्माण झाले आहे.
दरम्यान पंढरपूर येथील एका स्मशानभूमीत नुकतेच एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काल रक्षा विसर्जनासाठी या महिलेचे नातेवाईक तिथे गेले असता त्या ठिकाणी रक्षाच नसल्याचे दिसून आले. कारण हि रक्षा सोन्याच्या हव्यासापोटी काही चोरटयांनी चोरून नेली होती. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांच्यामध्ये मोठे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मृत महिलेची रक्षाच तिथे नसल्यामुळे आता रक्षा विसर्जनाचा विधी नेमका कसा करावा. असा प्रश्न या महिलेच्या नातेवाईकांना पडला होता. त्यामुळे हि रक्षा चोरणाऱ्या चोरट्यांचा पंढरपूर पोलिसांनी काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.