राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची हजारो रिक्त पदे भरली जाणार; आदिती तटकरेंची माहिती

0
2
Anganwadi workers and helpers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महिला व बालविकास विभागाच्या (Women and Child Development Department) अंतर्गत असणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये मोठी पदभरती होणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ही भरती पारदर्शक पद्धतीने होईल, असे स्पष्ट केले आहे. या भरती प्रक्रियेमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या हजारो जागा भरल्या जाणार आहेत.

18 हजारांहून अधिक जागांसाठी संधी

मिळालेल्या माहितीनुसार, महिला व बालविकास विभागात 18,882 पदांची भरती होणार आहे. यामध्ये 5,639 पदे अंगणवाडी सेविकांसाठी आणि 13,243 पदे अंगणवाडी मदतनीसांसाठी असतील. राज्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या 1,10,591 अंगणवाडी केंद्रांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील अनेक महिलांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

मुख्यसेविका पदांसाठीही भरती

याशिवाय, मुख्यसेविका पदासाठीही निवड प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत सरळसेवा आणि निवडीद्वारे 374 जागांची भरती होईल. यामध्ये 102 पदे सरळसेवेने, तर 272 पदे निवडीद्वारे भरली जातील. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

महिला व बालविकास क्षेत्रातील अन्य भरत्या

राज्यातील महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ, तसेच भिवंडी शहरातील अंगणवाडी केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीनेही पावले उचलण्यात येत आहेत. यासोबतच, राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील रिक्त पदे भरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी आवाहन

राज्यात एकूण 75 हजार पदभरती होणार आहे, त्यातील मोठा वाटा महिला व बालविकास विभागाच्या भरतीला असेल. यामुळे मंत्री अदिती तटकरे यांनी उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता भरती प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. या भरतीमुळे राज्यातील अंगणवाडी व्यवस्थापन अधिक सक्षम होणार होईल. तसेच, महिला सक्षमीकरणालाही मोठी चालना मिळणार आहे.