आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये 38 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला असून अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. . याबाबतची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागणीला यश आले असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मानधन वाढिवर शिक्कामोर्तब झाले आहे. याच बरोबर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याने ऐन नवरात्रीच्या पर्वावर अंगणवाडी सेविकांना डबल भेट मिळाली आहे.
याबाबत माहिती देताना अदिती तटकरे यांनी सांगितलं की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिलाय. मानधनात साधारण पन्नास टक्के वाढ आम्ही केली आहे असं त्यांनी म्हटले आहे
आता किती मिळणार मानधन ?
याबरोबरच ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3000 अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अंगणवाडी सेविकांना 10,000 मिळत होते त्यात आता पाच हजार अधिक मिळणार आहेत. मागच्या वेळेस 3000 वाढवले होते मात्र आता 5000 वाढवण्यात आले आहे. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
अंगणवाडी सेविकांना इन्सेंटिव्ह
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविकांनी मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे.