व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याच्या रागातून CRPF जवानाने केली महिलेची हत्या

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून एका सीआरपीएफ जवानाने विवाहित महिलेची हत्या केली आहे. या महिलेची हत्या केल्यानंतर तो जवान स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जवानाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. इस्लामपूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण
मृत महिलेचे नाव बेबीबाई भीमराव चव्हाण आहे. त्या किनवट तालुक्यातील बुरकुलवाडी येथील रहिवासी आहेत. तर आरोपीचे नाव सुरेश धनसिंग राठोड आहे. ते सेवानिवृत्त सीआरपीएफचे जवान आहेत. आरोपी राठोड सध्या बुरकुलवाडी या आपल्या गावी शेती करतात. काही दिवसांपूर्वी सुरेश राठोड यांच्या मुलीने गावातील एका मुलासोबत प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाला मृत बेबीबाई यांनी मदत केल्याचा दाट संशय आरोपी जवान सुरेश राठोड यांना होता. या संशयातून त्यांनी बेबीबाई यांची कोयत्याने वार करून हत्या केली आहे.

याअगोदरदेखील मृत बेबीबाई आणि आरोपी जवान राठोड यांच्यात मुलीच्या प्रेमविवाहावरून अनेकवेळा वाद झाला होता. ‘मी तुला सोडणार नाही, तुला कधी ना कधी बघून घेतो, अशी धमकीसुद्धा राठोड यांनी बेबीबाई यांना दिली होती. याच भांडणातून राठोड यांनी सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास बेबीबाई यांच्यावर कोयत्याने वार केला.यानंतर बेबीबाई यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बेबीबाई यांचा मुलगा मनोज चव्हाण यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी CRPF जवान सुरेश राठोड याला अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. इस्लामपूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.