सांगली प्रतिनिधी । ‘मी निवडूक लढवावी अशी पहिली इच्छा आ.अनिल बाबर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आपण या ठिकाणी आमदार बाबर यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या प्रचारासाठी आलो आहोत. अनिल बाबर यांना मत म्हणजेच मला मत. आजची सभा ही प्रचाराची सभा नसून आमदार अनिल बाबर यांची विजयी सभा आहे. निवडणूकीनंतर तीन महिन्यात टेंभूपासून वंचित गावांना पाणी देणार असून मुख्यमंत्री, अथवा आमदार अशा पदापेक्षा नवा महाराष्ट्र घडवायचाय, पुर्वी महाराष्ट्रात निवडणूकीचे वातावरण तरी दिसायचे पण आता सर्वत्र भगवे वातावरण झाले आहे, यावेळी विरोधी पक्ष शिल्लक आहेच कुठे? अशी बोचरी टीका युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. विटा येथील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी खासदार संजयकाका पाटील, राजेंद्रआण्णा देशमुख, संग्रामसिंह देशमुख, ब्रम्हानंद पडळकर, सुहास बाबर, अमोल बाबर, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्र रसातळाला गेला आहे. गेली पाच वर्षे आमची सत्ता आली. परंतु यांनी केलेला चुकीचा कारभार निस्तरण्यात गेली आहे. आता आपणाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या निवडणूक लढण्याच्या निर्णयाबाबत खुलासा करत आदित्य म्हणाले की, ‘मागील खेपेस मी आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारासाठी आलो होतो. त्यावेळी त्यांनी निवडणूकीत उभे रहा अशी इच्छा व्यक्त केली होती. वय बसत नसल्याने मी त्यावेळी उभा राहू शकलो नाही पण यावेळी उभा रहाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कसल्याही परिस्थितीत विटयात येवून आशिर्वाद घ्यायचा असा मी निश्चिय केला होता. मी निवडणूक मुख्यमंत्री, अगर आमदारकी अशा कोणत्याही पदासाठी म्हणून लढवत नाहीत महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षीत बेराजगार, प्रदुषण, असे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडविण्यासाठी व विकासाचा नवा महाराष्ट्र तयार करायचा आहे. खानापूर मतदारसंघात तर आपल्या महायुतीचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांना दोन्ही काँग्रेस लोक पाठींबा देत आहेत हे राज्यातले नवे समीकरण तयार होत असल्याचे समाधान असून लोक आता विकास करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.