असुरक्षित वाटतं असेल तर अमृता फडणवीसांकडे मुंबई सोडण्याचा पर्याय; शिवसेना मंत्र्याचे रोखठोक उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. अमृता फडणवीस यांच्या मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याच्या मुद्द्यावरही अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “गेली पाच वर्ष फडणवीस सरकार होतं. पोलीसदेखील तेच होते. सरकार बदललं म्हणजे पोलीस बदलत नाहीत. गेली पाच वर्ष ज्या पोलिसांच्या सुरक्षेत त्या होत्या आणि आहेत त्यांच्यावर अविश्वास असेल तर त्यांनी खुशाल राज्य सोडून द्यावं,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

असुरक्षित वाटण्यासारखं असं काय घडलं आहे?
“गेली पाच वर्ष त्यांनी पोलिसांची सुरक्षा घेतली. पाच वर्षात फडणवीस सरकारने पोलिसांना सतत शाबासकी दिली, त्यांच्या मागे ठामपणे उभी राहिले. फक्त खूर्ची गेली म्हणून असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्याकडे राज्य सोडणं हा एकच पर्याय असू शकतो. मुंबईच्या कोणत्याही नागरिकाने आम्ही असुरक्षित असल्याचं म्हटलेलं नाही. अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं असं काय घडलं आहे?,” अशी विचारणा अनिल परब यांनी केली आहे.

खूर्ची गेल्याची तडफड बाकी नाही
“हे राजकारण असून खूर्ची गेल्याची तडफड यामधून दिसत आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. मुंबई पोलीस सक्षम असून ते केस हाताळतील,” असंही ते म्हणाले आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासंबंधी होणाऱ्या मागणीवर बोलताना अनिल परब यांनी “मुंबई पोलीस सक्षम आहेत ते तपास योग्यरित्या हाताळतील. कोणीही मागणी केली म्हणून सीबीआयकडे तपास सोपवू शकत नाही. त्यासाठी कारणं द्यावी लागतात, असं म्हटलं. “गेल्या पाच वर्षात झालेल्या किती हत्या, आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. याचा लेखाजोखो समोर येऊ द्या. यामागे फक्त राजकारण आहे,” अशी टीका अनिल परब यांनी केली.

नितीश कुमार यांनी महाराष्ट्रात लक्ष घालू नये
नितीश कुमार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “नितीश कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. नितीश कुमार यांनी त्यांच्या राज्यात जे सुरु आहे त्यावर भाष्य करावं. या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून सगळेजण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते पोलिसाकडे द्यावेत. पण फक्त युवा नेत्याचं, मुख्यमंत्र्यांच नाव खराब करण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे”.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी ट्विटर लिहिलं की, “ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment