मुंबई । लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सलून सुरु करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे. येत्या २८ जूनपासून सलून सुरु होतील, अशी माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे सलून चालकांना फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. थोडे दिवस निरीक्षण केल्यानंतर यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
अनिल परब यांनी निर्णयाबद्दल बोलताना सांगितलं की, “२८ जूनपासून सलून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सलूनमध्ये फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, दाढी करण्यासाठी परवानगी नाही. सोबतच केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. थोडे दिवस पाहणी करुन नंतर पुढील निर्णय घेतला जाईल”.
गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीचा राज्यातील लाखो सलून व्यावसायिकांना फटका बसला आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना सोशल डिस्टसिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळून आपला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सलून चालकांकडून करण्यात येत होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”